पुण्यात मोदींच्या दौऱ्याला मोठा विरोध, मणिपूर घटनेवरून मोदींना दाखवले काळे झेंडे; पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

पुणे : लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सन्मानित केले जाणार आहे. येथील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, रिपब्लिकन व डाव्या तसेच आंबेडकरवादी, पुरोगामी पक्ष संघटना यांच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात येत आहे.
सकाळी ९ वाजल्यापासून मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून नरेंद्र मोदी चले जावच्या घोषणा दिल्या.बाजीराव रस्त्यावर देखील आंदोलन करण्याची तयारी विरधकांनी केली होती.

पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आमदार रविंद्र धंगेकर, मोहन जोशी, रमेश बागवे इत्यादी नेते आंदोलन करत होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनादेखील ताब्यात घेतले आहे.
पुण्यातील अनेक रस्ते असतील बंद
अलका चौक, स्वारगेट, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, पुणे विद्यापीठ चौक, टिळक रोड, शिवाजी चौक, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, सिमला ऑफीस चौक, संचेती चौक, संगमवाडी रोड, गोल्फ कल्ब चौक, विमानतळ रोड, स गो बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक आणि सेवासदन चौक हे प्रमुख मार्ग दुपारी ३ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. पुणे वाहतूक पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.