मोठी बातमी!उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. उद्धवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ भाजपच्या वाटेवर असल्याची कुणकुण लागताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांच्या हकालपट्टीची माहिती दिली.

खासदार संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की,पक्षविरोधी कारवायांबद्दल नाशिक शिवसेनेचे विनायक पांडे आणि यतिन वाघ यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे! जय महाराष्ट्र!”,

नाशिक महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पांडे, वाघ आणि खैरे यांच्याकडे दांडगा जनसंपर्क आणि स्वतःचे हक्काचे वॉर्ड आहेत. या नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम विधानसभा क्षेत्रातील भाजपची ताकद कित्येक पटीने वाढणार आहे.

आज होणाऱ्या या पक्षप्रवेशामुळे भाजपने एकाच वेळी शिवसेना उबाठा आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. विनायक पांडे हे उद्धव सेनेचा आक्रमक चेहरा आणि माजी महापौर होते. तर, यतीन वाघ यांची उद्धव सेनेतील प्रभावी नेते म्हणून ओळख होती. केवळ उद्धवसेनेलाच नाही, तर काँग्रेससाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान अनेक दशकांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या खैरे घराण्यातील शाहू खैरे यांनी भाजपची वाट धरल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
