मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटला मराठवाड्यातील ‘या’ आठ गावांचा विरोध ; प्रशासन पेचात…

पुणे : गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मोठे वादंग सुरू आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारने हैद्राबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्यासाठी मान्यता दिली आहे. तसेच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी देखील मान्य केली आहे. मात्र आता हैदराबाद गॅझेटला मराठवाड्यातील आठ गावांनी नकार दिला आहे.त्यामुळे प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांसाठी सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हे गॅझेट लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण मराठवाड्यातील या 8 गावांनी हैदराबाद गॅझेटला विरोध केला. या गावकऱ्यांनी सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केल्याने प्रशासनासमोर पेच पडला आहे.दरम्यान मोडी लिपीतील सर्व पुरावे कसबे तडवळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या रेकॉर्डमध्ये उपलब्ध आहे. आंबेजवळगा, कौडगाव, येडशी,जवळा, दुधगाव, कसबे तडवळा ,गोपाळवाडी,कोंबडवाडी अशा 8 गावांचा 1982 पर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये समावेश होता. या 8 गावातील ग्रामस्थ कुणबी नोंदी शोधण्यासाठी संभ्रमात आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर याविषयी माहिती स्पष्ट करून जनजागृती करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान 1982 पर्यंत धाराशिव जिल्ह्यातील 9 गावांचा समावेश सोलापूर जिल्ह्यामध्ये तर आता धाराशिव जिल्ह्यामध्ये समाविष्ट असल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.सातारा गॅजेट या संदर्भात स्पष्ट माहिती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हैदराबाद गॅझेट मध्ये मराठवाड्याची माहिती तर सातारा गॅजेट मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील माहिती असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 1982 पर्यंत ही गावं सोलापूर जिल्ह्यात होती. म्हणजे सातारा गॅझेट त्यांना लागू होणार असा त्यांचा दावा आहे. या सर्व घडामोडींमुळे प्रशासन आता पेचात पडलं आहे.
