मोठी बातमी! मराठ्यांच्या बलिदानाचं चीज झालं ; कुणबी प्रमाणपत्राचे वाटप अखेर सुरू…

पुणे : गेले अनेक महिने चाललेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं. मुंबईत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या. आरक्षणासाठी अनेकांनी प्राणांच बलिदानही दिल.अखेर या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पहिल्यांदाच पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली. त्यामुळे आंदोलकांनी आपल्या लढ्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त केली. २ सप्टेंबर २०२५ रोजी सरकारने काढलेल्या जीआरनंतर ही अंमलबजावणी झाली आहे. हैदराबाद गॅझेटमधील ऐतिहासिक नोंदींवर आधारित या प्रमाणपत्रांमध्ये ‘कुणबी’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी गेली अनेक महिने चाललेल्या संघर्षाला अखेर दिलासा मिळाला असून, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये आजपासून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले आहे. हे प्रमाणपत्र वाटप मराठा समाजासाठी एक भावनिक आणि ऐतिहासिक क्षण ठरला आहे. मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आपले प्राण दिले, उपोषणं केली, रस्त्यावर उतरले आणि अखेर या लढ्याला पहिलं यश मिळालं आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना सरकारच्या पावलाचं स्वागत केलं असलं तरी काही मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “८४ च्या जीआरचा आधार नेमका कसा घेतला गेला हे स्पष्ट व्हायला हवं,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, जर आरक्षणाबाबत काही गोंधळ झाला, तर दसऱ्यानंतर आंदोलन वेगळ्या पद्धतीने उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
