मोठी बातमी! पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातील निलंबित तहसीलदारांने ‘तो’ आरोप फेटाळला, केला मोठा दावा…..

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.या सगळ्या प्रकारानंतर तहसीलदार येवले यांनी आपल्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत. मी असा कोणताही व्यवहार केला नाही. पार्थ पवार जमीन व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही, असे म्हणत आपल्यावरील आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न तहसीलदार येवले यांनी केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे. मुद्रांक शुल्क म्हणून फक्त 500 रुपये दिले असा आरोप उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली तर केवळ 27 दिवसात हा व्यवहार झाला असेही दानवे यांनी म्हटलं आहे. या सर्व प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आल आहे. त्यानंतर त्यांनी आपली बाजू स्पष्ट करत माझ्यापर्यंत निलंबनाची कोणतीही माहिती आली नाही. पार्थ पवार प्रकरणात मी कोणताही व्यवहार केलेला नाही, मला याबद्दल काहीच माहिती नाही, असे तहसीलदार येवले म्हणाले आहेत.
तसेच जमीन व्यवहाराला आमच्याकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच परवानगी कुणी दिली, कोणत्या विभागाने दिली याची मला कल्पना नसल्याचे ते म्हणाले. माझ्यावर कोणत्या कारणाने कारवाई केली, हे देखील मला माहिती नाही. माझ्यापर्यंत निलंबनाचा आदेश आल्यानंतर अधिक बाबी स्पष्ट होतील, असे ते म्हणाले.
