मोठी बातमी! अजित पवारांच्या अस्थि विसर्जनानंतर सुप्रिया सुळेंचा मोठा निर्णय, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला गैरहजर?

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने पवार कुटुंबीयांसह संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची कमान सांभाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली जाणार आहे. आज सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. मात्र या शपथविधीला सुप्रिया सुळे गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सायंकाळी पाच वाजता त्या मुंबईत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.मात्र, या शपथविधीला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शपथ विधीबाबतची कुठलीही माहिती नसल्याचे सुप्रिया सुळें यांचं म्हणणे आहे. तसेच उद्या संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अधिवेशनासाठी सुप्रिया सुळे दिल्लीला जाणार आहेत.


दरम्यान अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केवळ प्रतिभा पवार यांना फोन करून शपथविधीसाठी मुंबईला जात असल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी खुलासा केला. शरद पवार म्हणाले, सुनेत्रा पवार यांच्याशी या विषयावर आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. शपथविधी होणार आहे, याचीही आम्हाला कल्पना नव्हती. एखादा पक्ष आणि त्याचे नेते काय निर्णय घेतात, हा त्यांचा अधिकार आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची कल्पना शरद पवारांच्यासह सुप्रिया सुळे यांना नसल्याने पवार कुटुंबियातील वाद चव्हाट्यावर आला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
