मोठी बातमी !जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक पुस्तिका जाहीर ; मात्र कार्यक्रमाची रुपरेषा नाही….


पुणे : गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याने इच्छुकांच्या स्वप्नावर पाणी फेरलं जात आहे. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून राज्य निवडणूक आयोगाने या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी संपूर्ण पूर्वतयारी करुन ठेवण्यात आली असून राजकीय पक्ष व संभाव्य उमेदवारांच्या मार्गदर्शक सुचनांची माहिती पुस्तिका शनिवारी (दि. १० जानेवारी) प्रसिद्ध केली आहे. या माहिती पुस्तिकेत जिल्हा परिषद निवडणुकीबाबबतची सविस्तर माहिती दिली आहे. परंतू , या माहिती पुस्तिकेतील निवडणूक कार्यक्रमाचे पान मात्र कोरे (रिकामे) सोडण्यात आले आहे.

दरम्यान जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ ही अंतिम मुदत दिलेली असूनसुद्धा अद्यापही राज्य निवडणूक आयोगाने याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नाही‌. राज्य निवडणूक आयोगाच्या या कृतीबाबत राज्यभर नाराजीचा तीव्र सूर उमटला होता. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेली ही माहिती पुस्तिका प्रसिद्ध केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या या माहिती पुस्तिकेत उमेदवारी अर्जाचा नमुना, उमेदवारी अर्ज दाखल करताना घ्यावयाची काळजी, आवश्यक कागदपत्रे, सूचक व अनुमोदक कोण असावेत, निवडणूक प्रचारासाठी आवश्यक परवानग्या कशा मिळवाव्यात, उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र कसे सादर करावे, उमेदवारांसाठी प्रवर्गनिहाय अनामत रक्कम किती, याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सदस्यांसाठीच्या आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक झाल्याने अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.मात्र या आव्हान याचिकांवरील प्राथमिक सुनावणीतही आरक्षणाची मर्यादा न ओलांडता निवडणूक घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती.

या पार्श्वभूमीवर आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका या पहिल्या टप्प्यात घेतल्या जातील आणि आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जातील अशी माहिती स्पष्ट केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!