मोठी बातमी! ईडीला धक्का, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना जामीन मंजूर…


मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खिचडी घोटाळ्यात ईडीनं त्यांना अटक केली होती. त्यांना आता मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. मागील एक वर्षांपासून सूरज चव्हाण हे तुरुंगात होते. मुंबई महापालिकेने कोरोनाच्या काळात गरीब, स्थलांतरीत नागरिकांना खिचडी पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते.

कंत्राटात निश्चित करण्यात आलेल्या वजनापेक्षा कमी खिचडी वाटप करण्यात आल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ईडीने सूरज चव्हाण यांना अटक केली होती. सूरज चव्हाण हे युवासेनेचे पदाधिकारी आहेत.

खिचडी घोटाळ्यातील आरोपी सूरज चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे. १ लाखाच्या रोख मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १७ जानेवारी २०२४ पासून सूरज चव्हाणांना अटक करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळातील या घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. महानगर पालिकेला खिचडीचं कंत्राट पुरवताना पॅकेटमध्ये ठरल्यापेक्षा कमी खिचडी भरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता.

खिचडी घोटाळा नेमका काय?

कोरोना काळामध्ये स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, आणि ज्या लोकांचे मुंबईमध्ये घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या ठाकरेंच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दर्शवला होता.

मुंबई महापालिकेने एकूण ५२ कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं. सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली होती. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव यामध्ये घेण्यात आले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!