मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणातून शरद पवार गटाची माघार? शशिकांत शिंदेंचा गौप्यस्फोट….

पुणे: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना आता अधिक जोर आला आहे.मात्र आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या चर्चा फेटाळण्यात आल्या आहेत.शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शशिकांत शिंदे यांनी असं म्हटलं आहे की, दादा असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणाबाबतचा निर्णय झाला होता. त्यांच्या पक्षातील अनेक लोक याबाबत बोलत आहेत. मात्र आता आम्ही हा विषय बंद केला आहे. आम्ही कधीच बोललेला नाही. आम्ही एवढंच म्हणालो की दादांची ही इच्छा होती ती पूर्ण करायची आहे. मात्र आता यावर बोलायचं नाही हे आम्ही ठरवलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणातून शरद पवार गटाने माघार घेतली असल्याचे चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणावर अजित पवारांसोबत सकारात्मक बोलणं झालं होतं आणि दोन्ही पक्ष एकत्र येणार होते असा दावा केला जात आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

दरम्यान या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा विरोध आहे का?यावर बोलताना ते म्हणाले,या बाबतीत मी काही बोलणार नाही, कारण त्यांची भूमिका त्यांनी मांडावी. आता आम्ही पुन्हा जोमाने काम करून पक्ष उभा करण्याची भूमिका घेत आहोत. त्यामुळे याबाबत त्यांची काय भूमिका आहे हे मी सांगणं योग्य ठरणार नाही असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.