मोठी बातमी! शनि शिंगणापूर देवस्थानचे कार्यालय सील, जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

पुणे : देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर देवस्थानचे कार्यालय जिल्हा प्रशासनाकडून सील करण्यात आल आहे. जिल्हाधिकारी यांनी स्वतः पोलीस बंदोबस्तात हे कार्यालय सील केल आहे. देवस्थान विश्वस्त मंडळावर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार, असे विविध गंभीर आरोप झालेले असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पाऊल उचलत मोठी कारवाई केली आहे.

देवस्थान विश्वस्त मंडळावर गेल्या काही महिन्यांपासून गैरव्यवहाराचे आरोप होत होते. देणग्यांमधील अपहार, खर्चातील अनियमितता, कामकाजातील ढिसाळपणा अशा विविध मुद्द्यांवरून विश्वस्त मंडळाविरोधात असंतोष वाढला होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासकीय नियंत्रण हाती घेतले.दरम्यान विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतरही प्रशासकीय कार्यालयातून कागदपत्रांची हेराफेरी सुरू असल्याच्या खात्रीशीर माहितीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित पुरावे नष्ट केले जावू नयेत, म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ग्रामस्थांच्या साक्षीनेच जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई केली आहे.या कारवाईदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. सर्वात मोठं प्रश्नचिन्ह म्हणजे कारवाईच्या वेळी कार्यकारी अधिकारी कार्यालयात हजर नव्हते. त्यांच्या गैरहजेरीमुळे प्रशासनावरील संशयाचे सावट अधिकच वाढले आहे.

