मोठी बातमी! ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ,पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचं निधन, 100 व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

पुणे : ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर एकनाथ चिटणीस यांच 100 व्या वर्षी बुधवारी सकाळी पुण्यात निधन झालं. इस्रोच्या भारतीय अवकाश संशोधन संस्थांच्या जडणघडणीत त्यांचा अत्यंत मोलाचा सहभाग होता. त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.यंदा जुलै महिन्यात चिटणीस हे शंभर वर्षांचे झाले होते. अहमदाबाद येथील इस्रोच्या अंतराळ अनुप्रयोग केंद्राचे दुसरे संचालक म्हणून त्यांनी काम केले होते. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी अखेर निधन झाले.

कोण होते पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस?

कोल्हापूर येथे २५ जुलै १९२५ रोजी जन्मलेल्या चिटणीस यांनी शालेय व उच्च शिक्षण पुण्यातून पूर्ण केले. नंतर ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चा अभ्यास केला. केरळमधील थुम्बा येथे भारताच्या पहिल्या रॉकेट प्रक्षेपणासाठी स्थळ निवडीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. फेब्रुवारी १९६२ मध्ये अहमदाबाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळेत तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, विक्रम साराभाई आणि डॉ. चिटणीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची पायाभरणी करण्यात आली होती. या बैठकीच्या काही दिवसांनंतर, १३ फेब्रुवारी १९६२ रोजी भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना करण्यात आली.

चिटणीस यांनी सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट’मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. नासा आणि इस्रो यांचा हा संयुक्त प्रयत्न होता. या प्रयोगांतर्गत नासाच्या एटीएस-६ उपग्रहाचा वापर करून सहा राज्यांतील २,४०० गावांमध्ये शैक्षणिक कार्यक्रम पोहोचविला. भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात त्यांची भूमिका होती.
१९८१-८५ दरम्यान अहमदाबाद येथील इस्रोच्या अंतराळ अनुप्रयोग केंद्राचे दुसरे संचालक म्हणून काम केले. तत्कालीन उदयोन्मुख अभियंता एपीजे अब्दुल कलाम यांना वैयक्तिकरित्या मार्गदर्शन केले. उपग्रह प्रक्षेपण यान प्रकल्प आणि प्रगत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठीही नामांकित केले होते. एपीजे अब्दुल कलाम नंतर भारताचे राष्ट्रपती झाले. डॉ. चिटणीस हे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि दोन दशकांहून अधिक काळ स्वतंत्र संचालक राहिले. अंतराळ अनुप्रयोग केंद्राच्या संचालकपदावरून निवृत्त झाल्यानंतर काही वर्षांनी डॉ. चिटणीस पुण्यात आले आणि पुणे विद्यापीठाशी संलग्न राहिले.
