लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या..

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील सर्व महिलांपर्यंत पोहोचावी म्हणून सरकार आता लाडकी बहीण योजनेचा सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचार करणार आहे. महायुती सरकारकडून यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.


महायुतीने निवडणुकीच्या तोंडावर गेल्या वर्षी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र आता गरजू आणि गावखेड्यातील महिलांना ही योजना कळावी म्हणून राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी तीन कोटी रूपयांची तरतूद केली आहे. या संदर्भाील जीआरही राज्य सरकारने जारी केला आहे.
लाडकी बहीण या योजनेसाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या आराखडा आणि त्याकरिता होणाऱ्या खर्चासाठी तीन कोटी रुपयांची मान्यता देण्यात येत आहे, असं जीआर मध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावरील खर्चासाठी दीड कोटी आणि डीजिटल मीडियावरील खर्चासाठी दीड कोटी अशा एकूण तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, या जाहिराती महिला व बाल विकास विभागाच्या समन्वयाने करण्याच्या सूचनाही जीआरमध्ये देण्यात आल्या आहेत. या जाहिरातीतून योजनेची माहिती आणि त्याच्या अटी तसेच शर्तीही महिलांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवल्या जाणार आहेत.
