मोठी बातमी! गौतमी पाटीलच्या कारला झालेल्या अपघात प्रकरणात पुणे पोलिसांना थेट केंद्रीय मंत्र्याचा फोन, कडक कारवाई…

पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारला झालेल्या अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. पीडितांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी थेट पुणे पोलिसांना फोन करून कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

मंगळवारी, पहाटे 5 वाजता पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात एका भरधाव वाहनाने एका रिक्षाला धडक दिली. हे वाहन गौतमी पाटील हिच्या नावावर असल्याचा समोर आलं. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सामाजी विठ्ठल मरगळे असे त्याचे नाव आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी 30 वर्षीय वाहन चालकाला अटक केली आहे. आता या अपघाताच्या तपासाला वेग आला आहे. हा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून, पोलिसांच्या दोन टीम तपासासाठी रवाना झाल्या आहेत. वाहनचालकाच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले गेले आहेत.

दरम्यान अपघातानंतर गौतमी पाटीलची कार टोईंग व्हॅनद्वारे घटनास्थळावरून हलवण्यात आली होती. ही टोईंग व्हॅन नेमकी कोणी आणली होती, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. दरम्यान, अपघातग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबीयांनी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन तपास योग्य पद्धतीने होत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी थेट पुणे पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
