मोठी बातमी! बारामती विमानतळावर प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं ; नेमकं काय घडलं?

बारामती: बारामती विमानतळावर शिकाऊ विमान कोसळल्याची धकादायक घटना समोर आली आहे.रेड बर्ड या प्रशिक्षण संस्थेंचे हे विमान लँडिंग करताना ही दुर्देवी घटना घडली. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक प्रतिनिधींनी दिली.या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी बारामतीमध्ये विमान लँडिंग करत असताना पुढील टायर निखळल्याने हे विमान टॅक्सी वे सोडून बाजूच्या गवतात गेले. त्यानंतर कंपनीच्या कर्मचा-यांनी तातडीने हे विमान बाजूला घेत दुरुस्तीचे काम सुरु केले होते. या बाबत रेड बर्डकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. हा अपघात विमानतळाच्या धावपट्टीनजिक असताना झाल्याने सुदैवाने कसलीही हानी झाली नाही. या पूर्वी दोनदा रेड बर्डच्याच शिकाऊ विमानांचे अपघात झाले होते.
दरम्यान या संदर्भात समजलेली माहिती अशी की, शिकाऊ वैमानिक विवेक यादव हे विमान बारामती विमानतळावर उतरवित असताना अचानक समोरील चाकात बिघाड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या नंतर त्यांनी इमर्जन्सी लॅंडीग करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात विमानाच्या समोरील पंख्याचे नुकसान झाले असून चाकानजिकच्या काही भागांचेही नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
