मोठी बातमी! ठाकरे बंधूंसह पवार अन् थोरातांची शिवालयात खलबतं, काय चर्चा?

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती जोमाने तयारीला लागली आहे. अशातच आता महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी, ज्यात महाविकास आघाडीचे घटक आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समावेश आहे. यांनी शिवालया येथे एका बंद दाराआड बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मतदार यादीमधील घोळ, बोगस मतदान आणि वॉर्डनिहाय याद्यांच्या पुनर्रचनेवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख आणि रायस शेख यांसह अनेक नेते उपस्थित होते.जवळपास १५ मिनिटे चाललेल्या या चर्चेनंतर हे शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले. या भेटीदरम्यान, विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाकडे मतदार यादीतील त्रुटी आणि मतदारांच्या संशयाबाबत निवेदन सादर केले जाणार आहे.
दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर २० वर्षांनी प्रथमच शिवालयात आले, तर शरद पवार १३ वर्षांनी मंत्रालयात निवडणूक आयोगाच्या कामासाठी उपस्थित राहणार असल्याने या घटनेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.