मोठी बातमी! 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटलांची निवड..

पुणे : साताऱ्यामध्ये जानेवारीत होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. विश्वास पाटील यांची ‘पानिपत’ ही प्रचंड गाजलेली कादंबरी आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची आज सकाळी महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी साहित्य महामंडळाच्या विविध शाखांकडून वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे सुचवण्यात आली होती. यामध्ये विश्वास पाटील, रंगनाथ पठारे, बाळ फोंडके अशी नावे आघाडीवर होती. पण चर्चेअंती विश्वास पाटील यांचं नाव निश्चित झालं. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी बैठकीनंतर विश्वास पाटील हे आगामी 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतील, असं जाहीर केलं. यावेळी मिलिंद जोशी यांनी आणखी महत्त्वाची माहिती दिली. यावेळच्या संमेलन हे राजकीय व्यासपीठ होणार नाही, याची काळजी घेऊ. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे नेतेमंडळी येतील, असं मिलिंद जोशी यांनी सांगितलं.

दरम्यान विश्वास पाटील यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून अध्यक्षपदाच्या शर्यतीत होतं. पण त्यांच्यासोबत आणखी दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या साहित्यिकांची नावेदेखील चर्चेत होती. ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावी यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांचंदेखील नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत होतं. पण भालचंद्र नेमाडे यांनी यापूर्वीच अध्यक्षपदाबाबत नकार दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पुण्यात आज पार पडलेल्या बैठकीत विश्वास पाटील यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.

