मोठी बातमी! कोथरूड प्रकरणातील पीडित मुलींच्या मेडिकल तपासणीचा अहवाल समोर

पुणे : कोथरूड मुलींच्या मारहाण प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाचा पीडित मुलींच्या तपासणीचा अहवाल पुणे पोलिसांना प्राप्त झाला आहे. पोलिसांनी पीडित तरुणींना हाणामार केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र ससून रुग्णालयाच्या तपासणी अहवालात तरुणींना कोणतीही ताजी दुखापत नसल्याचे समोर आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राहणारी 23 वर्षीय महिला पतीच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून पुण्याला आली होती. या महिलेला पुण्यातील तीन तरुणींनी मदत केली होती. मात्र कोथरूड पोलिसांनी या तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांना कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉरंट न देता ताब्यात घेऊन मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता या पिडीत मुलींच्या मेडिकल तपासणीचा अहवाल समोर आला आहे.
दरम्यान पीडित मुलींनी ससून रुग्णालयात 2 ऑगस्टला संध्याकाळी 5.40 वाजता वैद्यकीय तपासणी केली होती. यामध्ये तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी निरीक्षण नोंदवले आहे. तपासणी करण्यात आलेल्या मुलींना कोणतीही ताजी दुखापत नसल्याचे डॉक्टरांनी निरीक्षणात नोंदवले आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्या मुलींसाठी हा धक्का मानला जात आहे.