मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ‘ या’ मागणीला यश, 21 कुटुंबीयांना तब्बल 2 कोटी 10 लाखाची मदत…

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केलं. या आंदोलनाला अखेर यश आलं.सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या त्यानंतर आता जरांगे यांच्या आणखीन एका मागणीला यश आल आहे.आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी जरांगे यांनी केली होती. त्यानुसार शासनाने नांदेड जिल्ह्यातील २१ कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये प्रमाणे २ कोटी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

मराठा आरक्षणाची मागणीसाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणा दरम्यान केली होती. त्यापैकी नांदेडमधील आत्महत्या केलेल्या २१ जणांच्या कुटुंबियांना शासनाने प्रत्येकी १० लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी आत्महत्या केलेल्या १३ कुटुंबियांना आर्थिक मदत आणि दोन जणांना शासकीय नोकरीचा लाभ देण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा मागील अनेक वर्षांपासून सुरू होता. यापूर्वी ५८ मोर्चे निघाले होते. मागील दोन वर्षांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाचा लढा वाढत गेला. रस्ता रोको आंदोलनासह अनेक मोर्चे देखील काढण्यात आले. गावात राजकीय नेत्यांना बंदी देखील घालण्यात आली होती. याच मागणीसाठी अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली. एकट्या नांदेड जिल्ह्यात आता पर्यंत ३४ जणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली होती. त्यानंतर आता त्यांच्या मागणीला यश आल्याने मराठा बांधवाकडून कौतुक केले जात आहे.
