मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंचीं आमदारकी वाचली,शिक्षेलाही स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

पुणे :मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका खरेदी प्रकरणात अडचणीत आलेले माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कोकाटेंना सत्र आणि जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. कोकाटेंनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता आणि त्याची सुनावणी नुकतीच पार पडली. कोकाटेंची आमदारकी अपात्र ठरवणार नाही, असा दिलासा सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाला आहे.
अजित पवार गटाचे नेते आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर मुख्यमंत्री कोट्यातील शासकीय सदनिका प्रकरणात बनावट कागदपत्रे देऊन घर घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोन वर्षाचे शिक्षा सुनावली होती. या 30 वर्षांपूर्वीच्या प्रकरणामुळे कोकाटेंना शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याप्रकरणी आता त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे.
गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा निलंबित केली होती. परंतु प्रथमदर्शनी पुरावे कोकाटे यांच्या सहभागाकडे निर्देश करत असल्याचं नमूद करत उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. मात्र त्यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून कोकाटे यांची आमदारकी वाचली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला कोकाटे यांच्या संदर्भाने नोटीसही जारी केली आहे.

दरम्यान माणिकराव कोकाटे यांची बाजू ऐकून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. पूर्ण सुनावणी होईपर्यंत कोकाटे यांच्या शिक्षेला त्यांनी स्थगिती दिली आहे.तसेच कोकाटे यांची आमदारकी रद्द होणार नाही या संदर्भात त्यांनी राज्य सरकारला नोटीस काढली आहे.एकंदर सर्वोच्च न्यायालयाने कोकाटे यांना मोठा दिलासा दिला आहे.

