महिलांसाठी मोठी बातमी! E-KYC न केल्यास थांबू शकतो लाभ, ‘या’ तारखेपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या हप्त्याबाबत महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे. तसेच ई-केवायसी प्रक्रियेनंतर काही लाभार्थ्यांची नावे यादीतून कमी होणार का, याबाबतही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
राज्यात महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणाच्या उन्नतीसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने आर्थिक मदत दिली जाते.

मात्र, काही अपात्र व्यक्तींनीही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आल्यानंतर सरकारने यावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा फायदा मिळावा, हा उद्देश आहे.
ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पात्र महिलांना माहिती दुरुस्त करण्याची आणखी एक संधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
अधिकृत संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in वर 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठीच ही अतिरिक्त संधी देण्यात आली आहे.
ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान सुमारे 90 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली जाणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या वृत्तांबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थ्यांची कपात होणार असल्याच्या बातम्या चुकीच्या आणि अप्रमाणित आहेत. 31 मार्च 2026 पर्यंत सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली असून ही प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.