प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे धावणार ; कसा आहे प्रकल्प?

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर (अजनी)- पुणे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला ग्रीन सिग्नल दिला होता. त्यानंतर आता मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता नव्याने गती मिळणार आहे.
मुंबई -नागपूर ‘हायस्पीड रेल्वे’चा प्रस्ताव नेमका काय?
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला लागूनच समांतर असा हायस्पीड रेल्वे मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव आहे. या मार्गावर धावणारी रेल्वे ताशी 330 ते 350 किलोमीटर वेगाने धावेल. ज्यामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर अवघ्या दोन ते सव्वा दोन तासांत कापणे शक्य होईल. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करणार होते, मात्र गेल्या साडेतीन वर्षांपासून तो गुलदस्त्यात होता. या प्रकल्पासाठी नागपूर जिल्ह्यात 111 किलोमीटरचा ट्रॅक समृद्धी महामार्गालगत बांधण्याचा विचार होता, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर कार्यालयही उभारण्यात आले होते.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात मुंबई नागपूरच्या हायस्पीड प्रकल्पावर भाष्य केलं आहे. समृद्धी महामार्गाचं बांधकाम होत असताना रेल्वे मंत्रालयाने नागपूर ते मुंबई हायस्पीड रेल्वेवर अभ्यास केला आहे. 78 टक्के काम गतीने होणे शक्य आहे. तर 22 टक्के काम संयुक्तपणे करावे लागणार आहे. याबाबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, असे मुख्यमत्र्यांनी यावेळी सांगितले.
हा प्रकल्प आहे तरी कसा? लांबी किती? किती जिल्ह्यांमधून जाणार?
हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित प्रकल्पाचे तपशील खालीलप्रमाणे:
> एकूण लांबी : 749 किलोमीटर
> किती स्थानके? : 12
> किती जिल्हे जोडणार? : 10
> भूसंपादन किती ? : 1245.61 हेक्टर
> रेल्वेचा ताशी वेग किती ? : 330 ते 350 कि.मी.
> प्रवासी वाहतूक क्षमता : 750
> एकूण किती बोगदे? : 15,
> बोगद्यांची लांबी : 25.23 कि. मी.
> समृद्धी महामार्गालगत – 17.5 मीटर रुंदीचा मार्ग