मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का ; बड्या नेत्यांन ‘मशाल’ घेतली हाती

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे.शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकत आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या सर्वांच्या हातामध्ये शिवबंधन बांधत त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले. तसंच, निवडणुकीच्या कामाला लागावे असे आवाहन केले.उद्धव ठाकरे, राजन विचारे, किशोरी पेडणेकर आणि केदार शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर आज ठाण्यातील आणखी काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाण्यात शिंदेगटाला खिंडार पडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
दरम्यान मंगळवारीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने पक्षाची साथ सोडली होती. ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख रामचंद्र पिंगुळकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. रामचंद्र पिंगुळकर यांच्यासोबत त्यांचे सहकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील मशाल हाती घेतली होती. त्यानंतर पुन्हा एकदा शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

