मोठी बातमी! अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स नष्ट होण्यावर शंका ; पुरावा नष्ट केला? मिटकरींच्या सवालाने चर्चेला तोंड…

पुणे: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात असतानाच आता विमानातील ब्लॅकबॉक्स जळलेल्या अवस्थेत सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्लॅक बॉक्स नष्ट होण्याच्या शक्यतावर प्रश्न उपस्थित करत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी असे म्हटले आहे की, ब्लॅकबॉक्स कसा जळू शकतो? विमान अपघातात काहीही झालं तरी ब्लॅकबॉक्स अबाधित राहतो, याचा तपास कामात उपयोग केला जातो. मग नेमका याच प्रकरणात ब्लॅकबॉक्स कसा काय जळला? विमान खराब दर्जाचे होते का? असे गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. आता ते घरून किती वाजता व कोणत्या वाहनातून निघाले? ते कुठल्या रोडवर ट्रॅफिकमध्ये अडकले होते. तसेच संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, या सर्व बाबी 28 जानेवारी 2026 रोजीच्या दिनांक आणि वेळेसह महाराष्ट्राला कळवाव्यात, अशी त्यांनी विनंती केली आहे.

दरम्यान मिटकरी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ब्लॅक बॉक्स परदेशात रिकव्हर होणार असून अपघाताची माहिती लवकरच मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पारदर्शक चौकशी व्हावी या मागणीमुळे संबंधित यंत्रणांवर पारदर्शकतेचा दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.