मोठी बातमी! धनंजय मुंडेंचे कमबॅक, शिंदेंच्या नेत्याचीही एन्ट्री होणार, मंत्रिमंडळातून कोण होणार आउट?

पुणे : गेल्या सहा महिन्यांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचीं आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एन्ट्री होणार आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड अटकेत गेले. त्याच्या साथीदारांवर ‘मोका’ लागू करण्यात आला. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुंडे यांचे मंत्रिमंडळात कमबॅक होईल, अशी शक्यता कोणीही गृहित धरली नव्हती. मात्र आता त्यांचे लवकरच मंत्रिमंडळात पुनरागमन होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये पुढाकार घेत, मुंडे यांना मंत्रिमंडळात परत आणण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आगामी आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार किंवा बदलाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
दरम्यान दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे तानाजी सावंत यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र या दोघांचीं मंत्रिमंडळात एन्ट्री झाली तर कोणाला बाहेर जावे लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
