मोठी बातमी! बीडमध्ये मोठ्या हालचाली, संतोष देशमुखांच्या भावाची स्वतः आत्महत्या करण्याची घोषणा…

बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता एक महिना झाला आहे, परंतु आरोपींना अद्याप कोणतीही शिक्षा झालेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असताना, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी एक गंभीर निर्णय घेतला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत धनंजय देशमुख म्हणाले, खून प्रकरणातील आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. खंडणी ते खून प्रकरण हे काय कनेक्शन आहे हे सीआयडीने ३१ डिसेंबरला पहिल्या सुनावणीवेळी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आरोपीला १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तसेच वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल न झाल्याने आणि ३०२ मध्ये आरोपी न केल्याने धनंजय देशमुख यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जर या आरोपीला मोक्का आणि ३०२ आरोपामध्ये नाही घेतलं तर माझ्या कुटुंबाचं मोबाईल टॉवर आंदोलन असेल, त्या टॉवरवर मी स्वत:ला संपून घेतो.

हे आरोपी सोडले तर माझा हे खून करतील. माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल. माझ्या भावालाही वाटेल की, आपला भाऊ स्वत:संपला. त्यालाही समाधान वाटेल की अशा पद्धतीने मारला गेला नाही, असं धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलं. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मागणी केली होती, परंतु यंत्रणा आम्हाला तपासाची माहिती देत नाही.
मला आणि माझ्या कुटुंबाला दूर ठेवलं जात आहे. मी आणि माझे कुटुंबिय गांभीर्यपूर्वक हा निर्णय घेत आहे, असेही ते म्हणाले. आता ते टॉवर चढले असून आपण आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याठिकाणी मनोज जरांगे पाटील देखील दाखल झाले आहेत.