मोठी बातमी!बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ?

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या फेब्रुवारी -मार्च 2026 परीक्षेचे हॉल तिकीट आजपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.ही परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च पर्यंत सुरु असणार आहे.

विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे?

महत्त्वाचं म्हणजे सर्वात आधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.in सुरु करा.

वेबसाईट सुरु होताच नंतर होमपेजवर “HSC Hall Ticket 2026” वर क्लिक करा
दिलेली माहिती भरून लॉगिन करा.
स्क्रीनवर तुमचे हॉल तिकीट दिसेल; त्याची काळजीपूर्वक तपासणी करा.
हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
मिळालेल्या माहितीनुसार, बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होणार असून ती १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी ही हॉल तिकीटे डाउनलोड करून त्यांचे प्रिंटआउट विद्यार्थ्यांना द्यावे, असे निर्देश राज्य मंडळाकडून देण्यात आले आहेत.
बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रवेशपत्र देण्यात येणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. मात्र शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजने दिलेल्या हॉल तिकिटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही व शिक्का असणे अनिवार्य असणार आहे. फोटो असलेल्या प्रवेशपत्रावर अधिकृत स्वाक्षरी आणि शिक्का असणे गरजेचे आहे, अन्यथा ते वैध मानले जाणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
तसेच लेखी परीक्षेसोबतच प्रात्यक्षिक,तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएससीक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घेण्यात येणार आहेत.
या परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर,छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित केल्या जाणार आहेत.
