मोठी बातमी! राज ठाकरे यांना मोठा धक्का, मनसेची मान्यता रद्द करण्याची सुप्रीम कोर्टात याचिका..

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात चक्क सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात एका उत्तर भारतीय संघटनेच्या प्रमुखाने थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश दिले होते.
बँक, दुकानं आणि इतर आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो की नाही ते तपासायचे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले. यानंतर राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांनी विविध बँकांमध्ये जावून मराठी भाषेचा आग्रह धरला. काही ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांनी मराठी बोलणार नाही, अशी भूमिका घेतली.
यामुळे अनेकठिकाणी वाद झाला. संतापलेल्या मनसैनिकांनी अशा कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेमुळे अमराठी बँक कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. यामुळे आता उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली आहे. मनसे कार्यकर्ते हिंदी भाषिकांवर हल्ला करत असल्याचा आरोप सुनील शुक्ला यांनी याचिकेत केला आहे.
या याचिकेनंतर आता मनसेकडून काय उत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या भडकाऊ भाषणांमुळे हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत, असादेखील आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच मनसेची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. यामुळे मनसे आक्रमक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्या आग्रहानंतर संबंधित आंदोलन मागे घेण्याचं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यांनी एक पत्र लिहून याबाबत आंदोलन थांबवा असे आदेश दोन दिवसांपूर्वी दिले होते. अशात याचिका दाखल केली असल्याने मनसे आक्रमक होण्याची शक्यता आहे.