मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या जीआरवरून भुजबळ नाराज ; पण एकनाथ शिंदेंच्या गौप्यस्फोटानं खळबळ

मुंबई: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा नवा जीआर काढला. सरकारच्या तीन आदेशानंतर ओबीसी समाजामध्ये नाराजी सुरू झाली आहे. राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनीदेखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. भुजबळांच्या या नाराजीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मराठा आरक्षणाबाबतच्या जीआर काढण्याच्या वेळी काय झालं, याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, मराठा समाजास इतर मागास इतर प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र देण्याबाबत हैदराबाद गॅझेटमधील नोंदी ग्राह्य धरण्याबाबतचा शासन निर्णय करण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री मी आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, त्याशिवाय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान आरक्षणाच्या जीआर वरून नाराज असलेल्या भुजबळ यांनी बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीवरही बहिष्कार घालत आपली नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे महायुतीच्या कॅबिनेट बैठकीआधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची प्री-कॅबिनेट बैठक झाली. त्याला भुजबळ उपस्थित होते. त्याच्या नाराजीवर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्याबाबतच्या शासन निर्णयाची भुजबळ यांना पूर्वकल्पना असल्याचे त्यांनी म्हटले. मराठा आरक्षणाचा विषय आता संपला असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी केली होती.
