मोठी बातमी! लाडक्या बहिणी संकटात ; ‘या’ जिल्ह्यात 29 हजाराहून अधिक महिला अपात्र…..

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रिया बंधकारक करण्यात आली होती. या ई-केवायसी प्रक्रियेमुळे योजनेत पारदर्शकता येईल. पात्र लाभार्थ्यांनाच नियमितपणे मासिक 1500 रुपयांचा हप्ता मिळेल,असे सांगण्यात आले होते.मात्र आता लाडक्या बहिणी पुन्हा संकटात सापडल्या आहेत.अमरावती जिल्ह्यात योजनेतील 29 हजार 106 महिला संकटात सापडल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे, तांत्रिक तपासणीत त्या अपात्र ठरल्या असून, त्यामुळेच त्यांना मिळणारे दीड हजार रुपये बंद झाले आहेत. ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत, त्यांची नावं ही बालविकास विभागाने जाहीर केली आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाल्यापासून राज्यातील अडीच कोटींपेक्षाा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतल होता. त्यांच्या खात्यात दरमहिन्याला 1500 रुपये जमा होतात, मात्र आता सरकारने छाननी सुरू केली असून लाडकी बहीण योजनेत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता.18 नोव्हेंबरला ई-केवायसीची मुदत संपणार होती, मात्र लाखो महिलांची ही प्रक्रिया काही कारणांमुळे पूर्ण न झाल्याने ही मुदत वाढवण्यात आली. त्यानुसार आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत लाडक्या बहिणीनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. मात्र आता अमरावती जिल्ह्यातल्या हजारो बहिणी संकटात सापडल्या आहेत.

अमरावती जिल्ह्यातील योजनेतील महिलांची पात्रता रद्द ठरण्यामागे काही कारणं आहेत, त्यामध्ये आर्थिक स्तर, आरोग्य, पोषण यांचा समावेश असून त्यामुळे या महिलांची पात्रता नाकारण्यात आली आहे. तसेच या महिलांच्या बँक खात्यातील व्यवहार व जोडलेली कागदपत्रे यांच्या तफावत दाखवत आहेत. त्यामुळे त्या महिला अपात्र ठरल्या आहेत. सध्या अमरावती जिल्ह्यात तब्बल 9 हजार महिलांच्या कागदपत्रांची तपासणी सुरूच आहे. त्यामुळे आता या महिलांना मिळणारे 1500 रुपये अडकले असून त्यांना योजनेचा लाभ मिळणार का नाही, तो कधी मिळणार असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

