मोठी बातमी! पीएम किसान योजनेतून तब्बल 31 लाख शेतकरी होणार बाद, काय आहे कारण?

पुणे : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. ज्यात पीएम किसान सन्मान निधी योजना सर्वात महत्त्वाची आहे. या योजनेद्वारे सरकार कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते.सध्या शेतकरी 21 व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहे. पण त्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तब्बल 31 लाख शेतकरी या योजनेतून बाद होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे.

केंद्र सरकारनुसार, राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशातील जवळपास 31.01 लाख असे लाभार्थी आहेत, जिथे पती आणि पत्नी दोन्ही पीएम किसान योजनेचा लाभ उचलत आहेत. तर नियमानुसार, एक कुटुंबातील पती अथवा पत्नी यातील एकालाच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनाचा लाभ घेता येतो. त्यांच्या खात्यात वार्षिक 6 हजार रुपये जमा होतात. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कृषी मंत्रालयाने मोठ्या प्रमाणात अर्जांची, ईकेवायसीची पडताळणी सुरू केली आहे. त्यामध्ये एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती पीएम किसान निधी योजनेचा फायदा घेत असल्याचे समोर आले आहे. त्यांची नावं या यादीतून बाद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

31.01 लाख प्रकरणातील 19.02 लाख लाभार्थ्यांच्या कागदपत्रांचा पडताळा पूर्ण झाला आहे. यामधील 17.87 लाख म्हणजे 93.98 टक्के अशी प्रकरणं समोर आली आहेत, ज्यात पती आणि पत्नी हे दोघेही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता एकाच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

