मोठी बातमी!पुणे पोलीस दलात तब्बल 1720 पदांची भरती होणार?नव्या गावांचा समावेश झाल्यानंतर गृह विभागाची मंजुरी

पुणे : पुण्याची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता पुणे पोलीस दलात आता मोठी भरती होणार असल्याची माहिती समोर आली आहे.पुणे पोलीस दलात आता 1 हजार 720 पदे भरण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीकडून लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. ही पुणे पोलीस दलातील मागील काही वर्षांधील ही सर्वात मोठी भरती असणार आहे.

पुणे महापालिकेत नव्या गावांचा समावेश झाल्यानंतर पुणे शहराची भौगोलिक सीमा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिक्षण, आयटी, ऑटोमोबाईल आणि औद्योगिक केंद्र म्हणून पुण्याची ओळख निर्माण झाली असून पुण्याची सध्याची लोकसंख्या सुमारे ७० लाखांच्या घरात पोहोचली आहे. एवढ्या लोकसंख्येसमोर शहरात फक्त साडेआठ हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्याने गुन्हेगारी, वाहतूक कोंडी व नागरिकांच्या सुरक्षेवर मोठा ताण पडत आहे. त्यातही पुण्याच्या गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलीस दलात मोठी भरती होणार आहे.
कोंढावा पोलीस ठाण्यापासून विभाजन होऊन येवलेवाडी पोलीस ठाणे, सिंहगड पोलीस ठाण्यापासून विभाजन होऊन नऱ्हे पोलीस ठाणे, येरवडा पोलीस ठाण्यापासून विभाजन होऊन लक्ष्मी नगर पोलीस ठाणे, विमानतळ पोलिस ठाण्यापासून विभाजन होऊन लोहगाव पोलीस ठाणे तर हडपसर पोलीस ठाण्यापासून विभाजन होऊन मांजरी पोलीस ठाणे हे नवीन आज पोलीस ठाणे बनवणार आहेत.

दरम्यान कायद्याचे काटेकोर पालन व गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयाने पाच नवीन ठाण्यांची मागणी राज्य सरकारकडे केली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर गृह विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यामध्ये मांजरी, लोहगाव, येवलेवाडी, नऱ्हे, लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याला मंजुरी मिळाली आहे.