मोठी बातमी! कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मंजूर


कोल्हापूर : कोल्हापूर येथील कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणात एकूण बारा आरोपींना अटक करण्यात आली होती.यापैकी ९ जणांना यापूर्वीच जामीन मंजूर झालेला होता. मंगळवारी उर्वरित तीन जणांना कोल्हापूर बेंचने जामीन मंजूर केला.आरोपी विरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे, शरद कळसकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नुकत्याच स्थापन झालेल्या कोल्हापूर बेंचने जामीन मंजूर केला आहे.

नुकत्याच स्थापन झालेल्या कोल्हापूर बेंचच्या सुनावणीअंती गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील तिघा आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे ज्या १२ आरोपींना आजपर्यंत अटक करण्यात आली होती, त्या सगळ्यांनाच जामीन मिळाल्याने कॉम्रेड पानसरे यांची हत्या नेमकी केली कुणी, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
गेल्या १० वर्षांपासून केवळ संशयितांना ताब्यात घेण्यावाचून पोलिसांच्या हाताला काहीही लागले नाही. कुटुंबाच्या मागणीनुसार ऑगस्ट २०२२ साली दहशतवादविरोधी पथकाकडे तपास देण्यात आला. मात्र एकामागून एक १२ आरोपींना जामीन मिळाल्याने पानसरे यांची हत्या कुणी केली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहून बहुजन समाजाला खऱ्या शिवाजी राजाची ओळख देणारे द्रष्टे लेखक, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न ऐरणीवर आणणारे राज्यातील आघाडीचे कामगार नेते, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या १६ फेब्रुवारी २०१५ रोजी झाली. पत्नीसह प्रभात फेरीला गेलेल्या पानसरे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. गुन्हे अन्वेषण विभाग आणि विशेष पोलीस पथकाच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. मात्र पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात पोलिसांना यश आले नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!