मोठी बातमी! अजित पवार गटाच्या नेत्याला मध्यरात्री बेड्या ; काय आहे प्रकरण?

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याला पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते विनोद देशमुख यांना पोलिसांनी जळगावमध्ये मध्यरात्री अटक केली आहे. २०२२ मध्ये दाखल झालेल्या दरोडा व जीव घेण्याच्या धमकीच्या गुन्ह्यात तब्बल तीन वर्षांनी ही कारवाई झाली आहे.शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्यात व्यावसायिक मनोज वाणी यांच्या तक्रारीवरून 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. मात्र गुन्ह्यात गेली तीन वर्षे कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. आरोपानुसार, देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाणी यांच्या कार्यालयावर हल्ला करून दरोडा टाकला. तसेच जीव घेण्याच्या धमक्या दिल्या. त्यानंतर अखेर काल मध्यरात्री त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

विनोद देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या अटकेला राजकीय छटा लाभली असून, जळगाव जिल्ह्यातील सत्तासमीकरणावर याचा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.

