मोठी बातमी! अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी?

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यानंतर आता त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षामध्ये नेतृत्व आणि दमदार निर्णय घेईल अशा नेत्याची पोकळी निर्माण झाली होती. त्यानंतर या पदासाठी विविध नावांची चर्चा देखील करण्यात आली मात्र पक्षातील निवडक नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी पार्थ पवार यांचे नाव सुचवले असल्याची माहिती समोर आली, राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनापूर्वी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा सांभाळावी असं मतप्रवाह सुद्धा राष्ट्रवादीमध्ये आहे. 30 ते 35आमदार,विविध सेलचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी ही यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीमुळे त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून यासंदर्भात हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.