मोठी बातमी! केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 7 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता…

उत्तराखंडमधील केदारनाथ येथे आज पहाटे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत पायलटसह ७ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वीच अहमदाबादमध्ये विमान पडून 250 जणांचा मृत्यू झाला होता.
आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान कोसळले. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. गौरीकुंड परिसरात घास कापणाऱ्या महिलांनी हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती दिली. याबाबत तपास सुरू असून बचावकार्य केले जात आहे.
हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह रजवार यांनी दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी पोलिस, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने दाखल झाली आहेत. सर्वजण पर्यटक असल्याचे सांगितले जात आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. याआधी ८ मे रोजी उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर दुर्घटना घडली होती. त्या अपघातात वैमानिकासह सहा जणांचा मृत्यू झाला होता. याठिकाणी सतत या घटना घडत आहेत. चारधाम यात्रेदरम्यान हेलिकॉप्टर दुर्घटना आणि आणीबाणीच्या लँडिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका हेलिकॉप्टरला रस्त्यावरच क्रॅश लँडिंग करावे लागले होते, तर यात्रेच्या सुरुवातीला झालेल्या एका अपघातात अनेकांचा मृत्यू झाला होता. खराब हवामान आणि तांत्रिक बिघाड यामुळे वारंवार होणाऱ्या या दुर्घटना चिंतेचा विषय बनल्या आहेत.