मुख्यमंत्र्यांची मोठी चाल ; ठाकरे गटाच्या विधान परिषदेतल्या आमदारांना त्यांचा व्हीप मान्यच करावा लागणार… ?
मुंबई : राज्याचं अर्धसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच दुसऱ्या दिवशी नेमक्या काय घडामोडी घडणार याकडे फक्त राजकीय वर्तुळातूनच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून लक्ष लागून राहिलं आहे. त्यातच आता ठाकरे गटाच्या वाटेत अडथळे वाढताना दिसत आहेत. कारण, यावेळी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अधिवेशनादरम्यान मोठी चाल चालताना दिसत आहेत.
विधान परिषदेमध्ये शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र दिले आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोद पदी निवड करण्याचा ठराव झाल्याचे या पत्रात सूचित करण्यात आलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या या निर्णयामुळे आता उद्धव ठाकरेंनाही मुख्यमंत्र्यांचा आदेश मानावा लागणार आहे. विधानसभेनंतर आता विधानपरिषदेतही शिंदेंनी प्रतोद बदलण्याचा निर्णय घेतला आहे. विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोदपदी निवड करण्यात आल्याचं पत्र त्यांनी उपसभापती निलम गोऱ्हेंना दिलं आहे. दरम्यान बाजोरियांची प्रतोदपदी निवड झाल्यास ठाकरे गटाच्या विधान परिषदेतल्या आमदारांना त्यांचा व्हीप मान्यच करावा लागणार आहे. असं न केल्यास त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम असणार आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदेंविरोधात विधान परिषदेत अविश्वास ठराव आणण्याची ठाकरे गटाकडून तयारी केली जात आहे. यातच आता शिंदेंकडून पक्ष प्रतोद नेमण्याचं पत्र देऊन ठाकरे गटावर पहिला वार करण्यात आला आहे.