पुणेकरांना महागाईचा झटका! सीएनजीच्या दरात मोठी वाढ; मध्यरात्रीपासून नवे दर लागू, जाणून घ्या…

पुणे : पुणेकरांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. पेट्रोल आणि एलपीजी गॅसच्या दरांनंतर आता सीएनजीच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. शहरात सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ झाली असून हे नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

या दरवाढीचा थेट परिणाम सार्वजनिक वाहतूक आणि खाजगी वाहनधारकांच्या खर्चावर होणार आहे. विशेषतः रिक्षाचालक, कॅब चालक आणि दररोज सीएनजीवर चालणारी वाहने वापरणाऱ्या नागरिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
इंधन दरातील सततच्या चढ-उतारामुळे नागरिकांचे बजेट आधीच विस्कळीत झाले असताना, सीएनजी महागल्याने आता महागाईची चिंता आणखी वाढली आहे. दरवाढीनंतर पुणे आणि परिसरातील नागरिकांना सीएनजीसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

यापूर्वी सीएनजीचा दर 92.50 रुपये प्रति किलो होता, मात्र 2 रुपयांच्या वाढीनंतर तो आता 94.50 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. ही नवीन दरवाढ मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे.
या वाढीचा थेट परिणाम सार्वजनिक वाहतुकीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीएनजी महागल्यामुळे रिक्षा आणि कॅब चालकांच्या खर्चात वाढ होणार असून, रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर आणखी ताण पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या इराण-इस्रायल तणावाचा परिणाम थेट जागतिक इंधन बाजारावर होताना दिसत आहे. या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर आणि गॅस पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर भारतासह अनेक देशांमध्ये इंधन दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत असून, देशांतर्गत बाजारातही त्याचे पडसाद उमटत आहेत. परिणामी, पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, प्रीमियम इंधनाच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे. Indian Oil Corporationने आपल्या प्रीमियम श्रेणीतील इंधनांच्या किमतीत बदल केला आहे.सर्वाधिक शुद्ध मानले जाणारे ‘XP100’ पेट्रोल आता प्रति लिटर तब्बल 160 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
तसेच ‘एक्स्ट्रा ग्रीन’ डिझेलच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा परिणाम प्रीमियम वाहनधारकांवर थेट होणार असून, महागड्या इंधनाचा वापर करणाऱ्यांच्या खर्चात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.