पाडव्याआधी सोन्याच्या दरात मोठी वाढ! खरेदी महागणार, किती रुपयांनी वाढणार? वाचा सविस्तर..

नवी दिल्ली : गुढीपाडवा आता दोनच दिवसांवर येऊन उभा आहे. त्याआधी सोन्याच्या दरांनी मोठी भरारी घेतली आहे. ज्यामुळे मराठी नवीन वर्षाआधीच ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. जागतिक तसेच देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. दिल्लीत आज सोन्याच्या दरांनी ९१,००० रुपयांची पातळी ओलांडली.
आता ग्राहकांना प्रति १० ग्रॅम खरेदीसाठी ९१,०५० रुपये मोजावे लागतील. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरवाढीला चालना मिळत आहेत. पुढेही दरवाढीचा ट्रेंड सुरु राहील असा अंदाज आहे. यामागची प्रमुख करणे म्हणजे की सर्वप्रथम जागतिक पातळीवर आर्थिक अनिश्चितता कायम आहे तर, अनेक देशांमध्ये महागाई दिवसेंदिवस वाढतच जात आहे.
या वर्षी सोन्याच्या किमतीत आतापर्यंत १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर व्यापार धोरणांमुळे आर्थिक तसेच भू-राजकीय चिंता निर्माण झाल्या, ज्यामुळे सोन्याची मागणी सतत वाढत आहे. अमेरिकेच्या व्यापार धोरणांमुळे अनिश्चितता कायम आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींना बळ मिळत आहे. तसेच २०२५ मध्ये सोन्याची सरासरी किंमत प्रति औंस $३,०६३ आणि २०२६ मध्ये $३,३५० असण्याचा बोफाचा अंदाज आहे.
तसेच गोल्डमन सॅक्सनेही मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या मागणीचा अंदाज वाढवला. अमेरिकेच्या धोरणांबाबत अनिश्चितता असताना आणि चीन देखील सतत सोने खरेदी करताना, यामुळे सोन्याच्या किमती वाढू शकतात. तसेच चीन पुढील ३ ते ६ वर्षे सोने खरेदी करत राहील असा गोल्डमन सॅक्सचा अंदाज आहे. यामुळे येणाऱ्या काळात तरी किमती कमी होतील याबाबत तरी शंकाच आहे.
गोल्डमन सॅक्सने सोन्याच्या किमतींचा अंदाज बदलला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे सोन्याचे भाव वधारले असून गुंतवणूकदार आता यूएस फेड रिझर्व्हच्या धोरणांवर लक्ष ठेवून आहेत. २०२५ च्या अखेरीस सोन्याची किंमत प्रति औंस ३,३०० डॉलर्सपर्यंत पोहचू शकते. याआधी जागतिक इन्व्हेस्टमेंट बँकेने ३,१०० डॉलर्सचा अंदाज वर्तवला होता.
दरम्यान, मध्यवर्ती बँकांकडून सतत होणारी सोन्याची मागणी लक्षात घेता बदल करण्यात आला आहे. तसेच गोल्डमन सॅक्सने पूर्वीच्या ५० टनच्या उलट आता मध्यवर्ती बँका दरमहा ७० टन सोने खरेदी करतील, असा अंदाज आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमध्ये अचानक बदल आणि विलंब झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने अधिक आकर्षक बनले आहे. यामुळे दरही वाढत चालले आहेत.