मंत्रालयातील बडा मासा गळाला! निधी मंजूर करून घेण्यासाठी मागितली चक्क 6 लाखाची लाच,ACB कडून रंगेहात अटक

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. लाचखोर अधिकाऱ्यांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत आता मंत्रालयातील अर्थ आणि नियोजन विभागाचा मासा गळाला लागला आहे. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल 6 लाख 37 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कक्ष अधिकारी विलास लाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खारघर परिसरात रंगेहात अटक केली आहे. त्यामुळे मंत्रालयात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्याच्या बदल्यात विलास लाड याने संबंधित व्यक्तीकडे
मोठ्या रकमेची मागणी केली होती. शासकीय कामात अडथळा निर्माण करून लाच मागणाऱ्या या अधिकाऱ्याविरुद्ध संबंधित व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दाखल केली.या तक्रारीची दखल घेत एसीबीने सापळा रचला.आणि अधिकाऱ्याला 6 लाख 37 हजारांची लाच स्वीकारताना अधिकारी रंगेहात पकडून अटक केली.
मार्च महिन्यात आर्थिक वर्षाअखेरच्या पार्श्वभूमीवर एसीबीने मोठ्या प्रमाणात कारवाया देखील केल्या होत्या. आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या या कारवाईने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.मंत्रालयातील कामासाठी अशा प्रकारे उघडपणे लाच घेण्याचे हे दुसरे मोठे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

या कारवाईमुळे प्रशासनातील भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पुन्हा एकदा देण्यात आला आहे.