भोंदू खरात प्रकरणात मोठा स्फोट, महिला अधिकाऱ्याबाबत SIT चा धक्कादायक अहवाल…


नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक वळण आले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती महत्त्वाचे पुरावे लागले असून तपासाची दिशा अधिक गंभीर झाली आहे.

नाशिकमध्ये कार्यरत असलेली एक तत्कालीन महिला अधिकारी आता पोलिसांच्या रडारवर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या महिला अधिकाऱ्याने अशोक खरात याला प्रशासकीय पातळीवर मदत केल्याचे समोर येत असून, त्यासंदर्भातील धागेदोरे एसआयटीच्या हाती लागले आहेत.

अशोक खरात याने भोंदूगिरीच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातल्याचे आधीच समोर आले होते. मात्र, त्याचा हा प्रभाव केवळ अंधश्रद्धेपुरता मर्यादित नसून, काही प्रमाणात प्रशासकीय पाठबळही त्याला मिळत होते, हे आता स्पष्ट होत आहे.

नाशिकमध्ये कार्यरत असताना संबंधित महिला अधिकाऱ्याने खरातला विविध कामांमध्ये मदत केल्याचे समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या मदतीच्या बदल्यात खरातने आपल्या राजकीय आणि प्रशासकीय संपर्कांचा वापर करून त्या महिला अधिकाऱ्याला तिच्या पसंतीची पोस्टिंग मिळवून दिल्याची चर्चा रंगत आहे.

केवळ पोस्टिंगपुरतेच नव्हे, तर अशोक खरात आणि संबंधित महिला अधिकाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याची माहितीही समोर येत आहे. सध्या एसआयटीकडून या व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि बँक तपशीलांची सखोल पडताळणी केली जात आहे.

सरकारी पदाचा गैरवापर करून एका भोंदू व्यक्तीला पाठबळ देणे आणि त्याबदल्यात वैयक्तिक लाभ मिळवणे, या गंभीर आरोपांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!