शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या सोमेश्वर साखर कारखान्याचा मोठा निर्णय; एफ.आर.पी. वरील व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

पुणे : राज्यातील अग्रेसर असलेल्या पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने राज्य शासनाने निर्धारित केलेल्या नियमांनुसार या गाळप हंगामासाठी रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी.) ३ हजार २८५ रूपये प्रतिटन इतका निश्चित केला आहे. मात्र, कारखान्याच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांना अधिक दिलासा देत प्रथम हप्त्यापोटी ३ हजार ३०० रूपये प्रति मेट्रिक टन देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाच्या नियमानुसार गाळपासाठी आलेल्या ऊसाची एफ.आर.पी. रक्कम १४ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक असते. यावर्षी गाळपाच्या सुरुवातीच्या कालावधीत प्रथम हप्ता देण्याचा निर्णय उशिरा झाल्यामुळे त्या रकमेवर शासन नियमांप्रमाणे १५ टक्के व्याज देणे आवश्यक होते.

त्यानुसार १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत कारखान्यात गळीतासाठी आलेल्या ऊसाचा प्रथम हप्ता २९ नोव्हेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली आहे.

त्यांनी सांगितले की,आज अखेर कारखान्याचे ३लाख १ हजार ७६० मेट्रिक टन गाळप पूर्ण झाले असून जिल्ह्यातील सर्वाधिक साखर उतारा राखत ३ लाख १४ हजार ९५० साखर पोती उत्पादन करण्यात कारखान्याला यश आले आहे.
२५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा व्याजाचा लाभ त्वरित शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार हंगाम २०२१–२२ मधील १ कोटी १० लाख रुपये इतकी व्याजाची रक्कम जानेवारी २०२३ मध्येच वितरित करण्यात आली होती. हंगाम २०२२–२३ मधील २३.९० लाख रुपये, हंगाम २०२३–२४ मधील ४०.६८ लाख रुपये, हंगाम २०२४–२५ ६४.५८ लाख रुपये अशा प्रकारे एकूण १ कोटी २९ लाख रुपयांची रक्कम २ डिसेंबर २०२५ रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.
जगताप म्हणाले की, राज्यात एफ.आर.पी. उशीरा दिल्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम परत करणारा कारखाना सोमेश्वर हा कदाचित एकमेव कारखाना आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. सोमेश्वर साखर कारखाना गेली नऊ वर्षे शेतकऱ्यांना शासनाच्या एफ.आर.पी.पेक्षा अधिक दर देत आला आहे.
विविध हंगामांमध्ये कारखान्याने खालीलप्रमाणे जादा परतावा
२०२१–२२ : प्रति टन रु. २१८.३७ प्रमाणे रु. २८.९४ कोटी,२०२२–२३ : प्रति टन रु. ४९९.५१ प्रमाणे रु. ६२.७७ कोटी,२०२३–२४ : प्रति टन रु. ६९७.०२ प्रमाणे रु. १०२.११ कोटी,२०२४–२५ : प्रति टन रु. २२६.९४ प्रमाणे रु. २५.२३ कोटी
तसेच जगताप यांनी स्पष्ट केले की, शेतकरी हिताला प्राधान्य देण्याची परंपरा सोमेश्वर कारखाना पुढेही कायम ठेवणार असून,यंदाही एफ.आर.पी.पेक्षा जादा दर दिला जाईल असे त्यांनी सांगितले.
