मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ;’ या ‘जिल्ह्याचे पालकमंत्री अचानक बदलले, कारण काय?

पुणे : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने एका जिल्ह्यामधील पालकमंत्री अचानक बदलला आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहेत. आधी संजय सावकारे भंडाऱ्याचे पालकमंत्री होते. पण आता ही जबाबदारी पंकज भोयर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अचानक पालकमंत्री बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.

विदर्भातील भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आता पंकज भोयर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे वर्ध्याचे सुद्धा पालकमंत्री आहेत. वर्ध्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना पंकज भोयर यांनी आपली छाप उमटवली होती. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या कामाच कौतुक केलं होतं. त्यामुळे पंकज भोयर यांच्याकडे आता वर्ध्यासह भंडाऱ्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांची तडकाफडकी अशी अचानक बदली का केली? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
दरम्यान पालकमंत्री बदलण्याच्या निर्णयामागे भौगोलिक कारण सांगितलं जात आहे. संजय सावकारे यांच्यासाठी भंडारा जिल्ह्यापर्यंत येणं हा लांबचा प्रवास ठरत होता. काही स्थानिक भाजप नेते त्यांच्यावर नाराज होते अशी सुद्धा माहिती आहे. फक्त ते झेंडा पालकमंत्री ठरु नयेत, म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजवंदनापुरता मर्यादीत राहू नये, अशी जिल्ह्यात चर्चा होती. पंकज भोयर यांच्या नियुक्तीमुळे भंडारा जिल्ह्यात आता प्रशासकीय कामांना गती मिळेल अशी अपेक्षा आहे.पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे प्रशासनावर पकड असणं सुद्धा तितकच महत्वाच आहे, त्या दृष्टीकोनातून सुद्धा भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहेत
