चैत्र पौर्णिमेनिमित्त प्रशासनाचा मोठा निर्णय! तुळजाभवानीचे मंदिर 22 तास दर्शनासाठी खुले राहणार.

पुणे : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या चैत्र पौर्णिमा उत्सव कालावधीत राज्यभरासह कर्नाटक, आंध्र प्रदेश,तेलंगणा या राज्यातून 25 लाख भाविक दर्शनासाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेत 31 मार्च ते 2 एप्रिलदरम्यान तुळजाभवानीचे मंदिर 3 दिवस दररोज 22 तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तुळजाभवानी मातेच्या चैत्रपोर्णिमा उत्सव कालावधीत भाविकांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत यंदा तीन लाखांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने भाविकांसाठी पिण्याचे पाणी,सावलीची व्यवस्था करण्यात येत आहे. देवस्थानच्या वतीने दिवसभराचे दर्शन झाल्यानंतर रात्रीच्या वेळी परिसराची स्वच्छता केली जाते. या शिवाय हळदी-कुंकू, खेळणी, पाळणीचे स्टाँल लावण्यात येत आहेत.
आई तुळजाभवानी मातेच्या पौर्णिमा उत्सवादरम्यान उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता लक्षात घेता मंदिरात शेडनेट टाकून सावलीची व्यवस्था करण्यात येत आहे.जागोजागी भाविकांना रांगेतच ओआरएस उपलब्ध करुन दिले जाईल. त्यासाठी स्वयंसेवकनियुक्त केले जाणार आहेत.या कालावधीत या तीन दिवसांत छबिन्याचे आकर्षण असणार आहे.

तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरासह परराज्यातील भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यात 22 तास मंदिर दर्शनासाठी खूले राहणार असल्याने 22 तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याचेआदेश प्रशासनाने महावितरणला देण्यात आले आहेत. यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.