पंढरपुरात चैत्री यात्रेच्या तोंडावर प्रशासनाचा मोठा निर्णय; VIP दर्शन राहणार बंद..

पुणे : मराठी नवीन वर्षातील पहिल्या चैत्री एकादशीचा सोहळा येत्या 29 मार्च रोजी पंढरपुरात होणार आहे. या वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात येत असतात.भाविकांची ही प्रचंड गर्दी लक्षात घेता, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रशासनाने दर्शनाचे नियोजन सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

वारीच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष यांच्याकडून समोर आली आहे. यात्रा काळात मंदिरातील गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी भाविकांच्या हस्ते होणाऱ्या नित्य पूजा आणि टोकन दर्शन सुविधा तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, सर्वसामान्य वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन विनाविलंब मिळावे , यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात यात्रा काळात सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच मंदिर समितीशी संबंधित सर्व प्रथा परंपरांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. वाढते तापमान लक्षात घेऊन दर्शन रांगेतील भाविकांसाठी थंड पाणी, लिंबू सरबत,पंखे, कुलर तसेच आरोग्य सेवा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पंढरपूर येथे 29 मार्च रोजी चैत्री एकादशी साजरी होणार असून लाखो भाविकांसाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. 22 मार्च ते 2 एप्रिल व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे. या काळात मोठ्या संख्येने भाविक विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात.