१३ ऑगस्टला राज्यावर मोठं संकट, महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, हवामान विभागाकडून थेट अलर्ट..

पुणे : मागील काही दिवसांपासून पाऊस कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता हवामान विभागाकडून मोठा इशारा हा देण्यात आलाय. बुधवारी जोरदार पाऊस होणार आहे. भारतीय हवामान विभागाने १३ ऑगस्टसाठी महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
नागरिकांनी महत्वाचे कारण नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. या आठवड्यात बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे.
त्यामुळे १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्टदरम्यान विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १३ आणि १४ ऑगस्टला गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १४ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
मध्य महाराष्ट्रातील काही भागातही यावेळी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये १३ ऑगस्ट रोजी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे काही भागातील पिके कोमेजू लागली आणि शेतकरी चिंतेत आहेत. आता हवामान विभागाच्या नव्या अंदाजामुळे बळीराजाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.