यंदाची महाशिवरात्री ठरणार खास! त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांसाठी मोठे बदल, दर्शनापूर्वी ‘हे’ नवे नियम वाचा..

नाशिक : भगवान शंकराच्या आराधनेचा अत्यंत पवित्र मानला जाणारा महाशिवरात्री उत्सव यंदा १५ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात भाविकांच्या सोयीसाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्यपीठ म्हणून ओळख असलेल्या या तीर्थक्षेत्रात मोठ्या संख्येने भक्तांची उपस्थिती अपेक्षित आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर रविवारी पहाटे ४ वाजेपासून ते सोमवारी रात्री ९ वाजेपर्यंत अखंड दर्शनासाठी खुले राहणार आहे. लाखो भाविकांच्या संभाव्य गर्दीचा अंदाज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
यावर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी व्हीआयपी प्रोटोकॉल दर्शन, देणगी दर्शन तसेच गर्भगृह दर्शन पूर्णतः बंद राहणार आहे. सर्वसामान्य भक्तांना समान संधी उपलब्ध व्हावी हा यामागील उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी पूर्व दरवाजावरील दर्शन बारीचा वापर केला जाणार असून १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान सकाळी मंदिर उघडल्यापासून १०.३० वाजेपर्यंत स्थानिक ग्रामस्थांना विशेष सवलत दिली आहे. ओळखपत्र दाखवून पश्चिम दरवाजातून प्रवेश मिळेल, मात्र दर्शनानंतर दक्षिण गेटनेच बाहेर पडावे लागेल. ही सुविधा फक्त स्थानिकांसाठी मर्यादित असेल.
भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात राहील. संस्थानचे सुरक्षारक्षकही त्यांना सहाय्य करतील. मंदिर परिसर सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली राहणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य पथकांची नियुक्ती आणि प्रसाद वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आकर्षक स्ट्रक्चरल विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले असून गर्भगृह, सभामंडप तसेच उत्तर व पूर्व महाद्वार फुलांनी सजवले जाणार आहेत.
१५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातून निघून पारंपरिक मार्गाने तीर्थराज कुशावर्त येथे जाईल. तेथे षोडशोपचार पूजा संपन्न होऊन सायंकाळी ५ वाजेपर्यंत पालखी पुन्हा मंदिरात परतेल. त्यानंतर लघुरुद्र अभिषेक पार पडेल. रात्री ११ वाजता महापूजा आणि अंतर्गत पालखी सोहळा होणार आहे.
पालखी सोहळा
१५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातून निघेल.ती परंपरागत मार्गाने तीर्थराज कुशावर्त येथे जाईल. तेथे षोडशोपचार पूजा होईल.संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पालखी पुन्हा मंदिरात परतेल. संध्याकाळी ५ वाजता लघुरुद्र अभिषेक होईल. रात्री ११ वाजता महापूजा आणि अंतर्गत पालखी सोहळा पार पडेल.
सांस्कृतिक कार्यक्रम
१४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून ते रात्री९. ३० वाजेपर्यंत या वेळेत श्रीधर फडके यांचा “गीत रामायण” कार्यक्रम होईल.
१६ फेब्रुवारी रोजी विविध कथ्थक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.