राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात मोठा बदल, हिंदी सक्तीला विराम, नवीन अभ्यासक्रमातही बदल…

पुणे : हिंदी सक्तीला झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात मोठा निर्णय घेतला आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या मसुद्यानुसार तिसरी ते दहावी या इयत्तांमध्ये तिसरी भाषा शिकवणे आता अनिवार्य राहणार नाही.

यामुळे हिंदी सक्तीला विरोध करणाऱ्या पालक, शिक्षक आणि शैक्षणिक संघटनांचा मागोवा घेत राज्य सरकारने ही महत्त्वाची सुधारणा केली आहे. पूर्वीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तिसऱ्या भाषेच्या रूपात हिंदीचा समावेश सुचवण्यात आला होता.
मात्र, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या नव्या अभ्यासक्रम मसुद्यात हिंदीचा उल्लेख वगळण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील भाषिक बोजा कमी होणार आहे.

एससीआरटीने तयार केलेल्या मसुद्यानुसार मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कला व हस्तकला शिक्षण, व्यावसायिक कौशल्य शिक्षण, शारीरिक आरोग्य शिक्षण आणि मूलभूत मूल्य शिक्षण या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी जीवनोपयोगी आणि व्यावसायिक कौशल्यांचा अधिक सराव करू शकणार आहेत.
दरम्यान, या अभ्यासक्रमात बहुभाषिक सक्ती ऐवजी स्थानिक गरजांवर आधारित शिक्षणावर भर दिला जात आहे. यामुळे स्थानिक भाषांचा सन्मान राखत विद्यार्थ्यांना अधिक सुसंगत शिक्षण दिले जाईल, असा विश्वास शैक्षणिक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हा नवीन अभ्यासक्रम SCERT च्या www.maa.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर 28 जुलैपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. नागरिक, पालक आणि शिक्षक आपले अभिप्राय आणि सूचना ऑनलाईन पद्धतीने पाठवू शकतात. ही प्रक्रिया पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने राबवली जाणार असल्याचे संचालक राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले.