रेशन व्यवस्थेत मोठा बदल, कागदी रेशनकार्ड आता होणार इतिहासजमा, गैरप्रकार थांबणार…


पुणे : रेशनकार्ड असलेल्या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आहे. विविध शासकीय योजनांसाठी अर्ज करताना रेशनकार्ड आवश्यक ठरते. तसेच रेशनकार्ड हा नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो.

मात्र पारंपरिक कागदी रेशनकार्डांमुळे बनावट नोंदी, डुप्लिकेट लाभार्थी आणि इतर गैरप्रकार वाढल्याचे समोर आले आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणि आधुनिकता आणण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, यासाठी लवकरच स्मार्ट रेशन कार्ड योजना राबवण्यात येणार आहे. फेब्रुवारीनंतर स्मार्ट रेशन कार्ड वाटप सुरू होणार असून बोगस प्रकारांना आळा बसेल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

एटीएम कार्डसारखे दिसणारे, पीव्हीसी स्वरूपातील हे शिधापत्रिकेचे कार्ड क्यूआर कोड आणि ई-स्वाक्षरीसह दिले जाणार आहे. या स्मार्ट कार्डमुळे लाभार्थ्यांची अचूक ओळख पटवणे सोपे होणार असून गैरवापराला मोठ्या प्रमाणात प्रतिबंध बसणार आहे.या उपक्रमामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेला डिजिटल स्वरूपात अधिक बळकटी मिळणार आहे.

नवीन स्मार्ट रेशन कार्डवर क्यूआर कोड आणि ई-साइन असणार आहे. त्यामुळे कार्ड स्कॅन करून माहिती लगेच तपासता येईल.धान्य घेताना रेशन दुकानात बोटांचे ठसे (बायोमेट्रिक) देणे आवश्यक असेल. यामुळे बनावट नावे, एकाच व्यक्तीने दोनदा धान्य घेणे असे प्रकार थांबतील. हे कार्ड पीव्हीसीचे (प्लास्टिकसारखे मजबूत) असल्यामुळे ते सहज फाटणार नाही किंवा खराब होणार नाही. पाऊस, उष्णता अशा कोणत्याही हवामानात ते टिकाऊ राहील.

शहरात चिंचवड (अ), पिंपरी (ज) आणि भोसरी (क) अशी तीन परिमंडळे कार्यरत आहेत. या भागांमध्ये सुमारे 4 लाख 23 हजार लाभार्थी 260 रेशन दुकानांमार्फत धान्य घेतात. या सर्व लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका एकाचवेळी न देता टप्प्याटप्प्याने वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!