सोलापुरात शिंदे गटाला मोठा धक्का! ‘हा’ नेता भाजपमध्ये जाणार, समीकरण बदलणार…

सोलापूर : राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वी आता पक्षांतराला वेग आला आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र हे यश त्यांना विधानसभा निवडणुकीत टिकवता आलं नाही.

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचं पहायला मिळालं, दरम्यान अजूनही हे पक्षप्रवेश सुरूच आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रमुख नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी, मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे.

दरम्यान, राजकीयदृष्ट्या ही अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे, कारण नागनाथ क्षीरसागर हे मोहोळमधील माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात.
धक्कादायक म्हणजे, उद्या नागनाथ क्षीरसागर यांच्यासोबतच राजन पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एकेकाळचे कट्टर विरोधक आता एकाच पक्षात येत असल्याने मोहोळच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतून अनेक नेत्यांनी महायुतीत प्रवेश केला होता. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीमधील मित्रपक्षांमधूनच (शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. या प्रकारामुळे मित्रपक्षांमध्ये नाराजी वाढत आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी यापूर्वीच जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.
