शरद पवारांना मोठा धक्का ; कट्टर समर्थक पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत..

पुणे : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधील अनेक माजी मंत्री व माजी आमदार यांच्यासह नेत्यांनी पक्षातून काढता पाय घेतला आहे. यातून पक्ष सावरला नसतानाच आता शरद पवार यांचे कट्टर समर्थक व निष्ठावंत समजले जाणारे विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी देखील पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसणार आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या अरुणभाई गुजराथी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ सोडल्यास ते कुठल्या पक्षात प्रवेश करतील याबाबत आता राजकीय गोटात उत्सुकता आहे. भाजपमध्ये प्रवेश करणार की राष्ट्रवादी अजित पवार गटात ? याबाबत देखील चर्चा होती. मात्र, अरुणभाई राजकारणातून संन्यास घेत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. एक मोठा नेता सोबत नसल्यास शरद पवार गटाला चोपडा तालुक्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे सांगतानाच राजकारणातून हळूहळू बाहेर पडणार असल्याची माहिती अरुणभाई यांनी दिली आहे.माझ्यासोबतच्या अनेक पदाधिकारी तसेच नेत्यांनी पक्ष सोडला आहे. कार्यकर्तेही दुसरीकडे गेले आहेत. पवार साहेबांनी मला खूप दिले आहे. मात्र, माझे वय झाले आहे, त्यामुळे हळू हळू राजकारणातून बाहेर पडणार आहे असं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
